नेहमी प्रमाणे या वर्षी देखील २९ सप्टेंबर रोजी जागतिक हृदय दिन साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि त्यासंबंधित आजारांविषयी जागरूकता निर्माण करणे. तसेच लोकांनी आरोग्यदायी जीवनशैली अवलंबावी यासाठी प्रोत्साहन देणे.
तरुणांमध्ये वाढणारा धोका
तज्ञांच्या मते, सध्या २५ ते ४५ वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. हृदय हे शरीरातील रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते. त्यामुळे हृदयाची तब्येत बिघडल्यास संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. धोक्याची बाब म्हणजे, अनेक वेळा हृदयविकाराची सुरुवात लक्षणांशिवाय होते आणि अचानक गंभीर रूप धारण करते.
हृदयविकाराची कारणे
-आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकाराचे प्रमाण वाढते आहे.
-जास्त प्रमाणात तेलकट, मसालेदार आणि प्रोसेस्ड फूड खाणे.
-धूम्रपान व दारूचे अतिसेवन.
-सततचा मानसिक ताण.
-दीर्घकाळ बसून काम करण्याची सवय.
-मधुमेह आणि उच्च रक्तदाब.
ही कारणे हृदयावर ताण आणतात आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान करतात.
लक्षणे लक्षात घ्या
हृदयविकार बहुतेक वेळा सुरुवातीला शांतपणे वाढतो, पण काही लक्षणे दिसली तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा:
छातीत दडपण, जळजळ किंवा वेदना.
चालताना किंवा थोड्याशा कामानेही थकवा.
डोकेदुखी, कमजोरी.
हात-पाय किंवा खांद्याला वेदना.
श्वास घेण्यास त्रास.
हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपाय
तज्ञांच्या मते, खालील गोष्टींचे पालन केल्यास हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकतो:
संतुलित आहार – ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी तेल-मसालेदार पदार्थ
नियमित व्यायाम – रोज ३० ते ३५ मिनिटे चालणे, धावणे, योग, स्ट्रेचिंग
ताण नियंत्रण – ध्यान, प्राणायाम, मानसिक शांतीचे सराव
धूम्रपान व दारूपासून दूर राहणे
नियमित तपासण्या – रक्तदाब, कोलेस्टेरॉल, शुगर, स्ट्रेस टेस्ट
आधुनिक तंत्रज्ञानाची मदत
अलीकडील संशोधनानुसार, स्टेंटिंग, बायपास सर्जरी, औषधोपचार आणि जीवनशैलीतील बदल यांच्या मदतीने हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. तसेच स्मार्टवॉच आणि फिटनेस ट्रॅकर्स यांच्या साहाय्याने हृदयाचे ठोके व आरोग्य सतत तपासता येते.
तज्ज्ञांचे मत
हृदयरोगतज्ज्ञांच्या मते, “पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि हानिकारक सवयींवर नियंत्रण हे हृदयाचे आयुष्य वाढवण्यासाठी आवश्यक आहे.”
थोडक्यात, जागतिक हृदय दिनानिमित्त आपण हे लक्षात ठेवायला हवे की आरोग्यदायी जीवनशैली, वेळेवर तपासण्या आणि हानिकारक सवयींवर नियंत्रण यामुळेच हृदय निरोगी आणि आयुष्य निरामय राहू शकते.
