पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील प्रत्येक नागरीकासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळी अगदी चार दिवसांवर आली असताना अजूनही महाराष्ट्रातून पावसाचा मुक्काम हलताना दिसत नाही. हवामान विभागाने ताजा अंदाज जाहीर केलाय. त्यानुसार उद्या गुरुवार 16 ऑक्टोबर ते परवा शुक्रवार 17 ऑक्टोबर दरम्यान 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाय.
महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाने धुमाकूळ घातलाय. शेतकऱ्यांचे पीक सोडा जमिनीसुद्धा खरडवून गेल्यात. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी होतेय. येणारी दिवाळी कशी साजरी करायची असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यातच पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकलाय.
हवामान विभागाने आज बुधवारी दुपारी ताजा अंदाज जाहीर केला. त्यानुसार बुधवार, 15 ऑक्टोबर रोजी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, सातारा घाट, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय.
हवामान विभागाने गुरुवार, 16 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, जळगाव, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट, सातारा घाट, सातारा, रायगड, रत्नागिरी, धुळे या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
नाशिक, नाशिक घाट, पालघर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आलाय. या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि गडगडाटी वादळासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. या काळात सोसाट्याचा वारा रारण्याचा अंदाज असून, त्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यताय.
