जळगाव : वाघूर जलाशयातील पाणीसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जळगाव महापालिकेने शहरातील पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारपासून (ता. १७) शहरात दीड तासांऐवजी एक तास १५ मिनिटेच पाणीपुरवठा केला जाणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार पाण्याच्या उपशात दहा टक्के कपात करण्याच्या नियोजनातून ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उपलब्ध वेळेत पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
वाघूर जलाशयाची एकूण पाणीसाठवण क्षमता २४९.९१८ दशलक्ष घनमीटर असून, सध्या १७३.१७९ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा आहे. हा साठा क्षमतेच्या सुमारे ७० टक्के आहे. सन २०२६-२७ या पाणी आरक्षण वर्षासाठी जळगाव शहराला ४० दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत पाच दशलक्ष घनमीटर पाणी वापरण्यात आले असून, उर्वरित ३५ दशलक्ष घनमीटर पाणी जून २०२७ पर्यंत पुरवायचे आहे.

दररोज ९० ते ९५ दशलक्ष लिटर उपसा
जलाशयातून दररोज सुमारे ९० ते ९५ दशलक्ष लिटर कच्च्या पाण्याचा उपसा केला जातो. शहराची शुद्ध पाण्याची दैनंदिन गरज सुमारे ९० दशलक्ष लिटर आहे. सध्या दोन दिवसांच्या अंतराने, म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा होतो. यासाठी पंपिंग यंत्रणा दररोज २० ते २१ तास सुरू ठेवावी लागते.
पुढील कपातीचेही संकेत
जलाशयातील साठा कमी झाल्यास पाणीपुरवठ्याच्या अंतरात वाढ करण्याचा पर्याय महापालिकेने विचाराधीन ठेवला आहे. त्यानुसार सध्याच्या दोन दिवसांच्या अंतराऐवजी तीन दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जाऊ शकतो. याशिवाय जलवाहिन्यांची गळती दुरुस्ती, नळांना तोट्या बसविणे आणि अनधिकृत नळजोडण्यांवर नियंत्रण ठेवण्यावर भर दिला जाणार आहे. वाहन धुण्यासाठी किंवा रस्त्यांवर पाणी मारण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही केली जाणार आहे. नागरिकांनी पाण्याची नासाडी टाळून सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


