Home » जळगाव » वेल्डिंगदरम्यान अंडरग्राउंड वायरचा फटका; २२ वर्षीय तरुणाचा बळी

वेल्डिंगदरम्यान अंडरग्राउंड वायरचा फटका; २२ वर्षीय तरुणाचा बळी

यावल : प्रतिनिधी

तालुक्यातील पाडळसा गावात एका घरात वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम सुरू असताना झालेल्या दुर्घटनेत २२ वर्षीय तरुणाचा विद्युत शॉक लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाडळसा (ता. यावल) येथील सुधाकर ओंकार चौधरी यांच्या घरी वेल्डिंग करून ग्रील बसवण्याचे काम सुरू होते. यासाठी ड्रिल मशीनच्या सहाय्याने भिंतीत छिद्र पाडण्यात येत होते. यावेळी भिंतीत अंडरग्राउंड असलेली विद्युत वायर कुठेतरी कट झाल्याने छिद्र पाडलेल्या ठिकाणी खिळा ठोकत असताना तौफीक खान अश्रफ खान (वय २२, रा. रविवार पेठ, सावदा ता. रावेर) याला जोरदार विद्युत शॉक लागला.

विद्युत शॉक लागताच तौफीक खान जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाला. त्याला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर फैजपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संतोष चौधरी करीत आहेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *