अमळनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील मंगरूळ शिवारात ६ रोजी रात्रीच्या सुमारास धुळ्याकडे जाताना दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली आहे.

सविस्तर वृत्त असे कि, चाळीसगाव तालुक्यातील भामरे येथील संतोष चिंतामण चंदासरे (वय ६०) हे वृद्ध कामानिमित्त अमळनेर शहरात आले होते. ते आपल्या दुचाकी (एमएच – १९, बीएच-४२३०) ने परत जात असताना मंगरूळच्या वृंदावन हॉटेल पुढे दुचाकी घसरुन ते गंभीर जखमी झाल्याची घटना ६ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. संतोष चंदासरे यांच्या डोक्यातून रक्त वाहत होते, त्याच अवस्थेत ते सुमारे अर्धा तास तेथेच पडलेले होते. हॉटेल मालक किरण पाटील, चेतन पाटील, युवराज सोनवणे, गणू पाटील यांनी त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. घटनेचे वृत्त कळताच हे. कॉ. कैलास शिंदे, काशिनाथ पाटील, पो.पा. भागवत पाटील यांनी घटनस्थळी जाऊन पंचनामा केला. घटनास्थळावर एक पीकअप व्हॅन बंद अवस्थेत दिसून आली. मात्र, वाहनाला धडक लागल्याचे काहिच दिसून आले नाही. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.



