Home » जळगाव » विधानपरिषद २०२६ : गाठीभेटींमधून नंदकिशोर महाजनांना वाढता पाठिंबा

विधानपरिषद २०२६ : गाठीभेटींमधून नंदकिशोर महाजनांना वाढता पाठिंबा

जळगाव : विधानपरिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी प्रचाराला वेग दिला असून मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटींवर त्यांनी विशेष भर दिला आहे. जिल्ह्यातील विविध नगरपालिका, नगरपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींशी संवाद साधत त्यांनी आपली भूमिका आणि विकासाचा दृष्टिकोन मांडला.

महायुतीमधील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकजुटीने महाजन यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे निवडणुकीत महायुतीची ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील शेकडो नगरसेवकांनी नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीला पाठिंबा दर्शवत त्यांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. विविध भागांतील भेटीगाठीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांसमोरील समस्या, विकासकामे आणि जनतेच्या अपेक्षा यावरही चर्चा करण्यात येत आहे.

नंदकिशोर महाजन यांची कृषी क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असून विशेषतः जळगाव जिल्ह्याच्या अर्थकारणाशी निगडित असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांना सखोल ज्ञान आहे. विधानपरिषदेत निवडून गेल्यानंतर शेती, सिंचन, बाजारपेठ आणि शेतकरी हिताच्या विविध मुद्द्यांवर ते प्रभावीपणे आवाज उठवतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी महाजन यांचे नेतृत्व महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास अनेक लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला आहे. महायुतीच्या भक्कम पाठबळामुळे आणि वाढत्या जनसंपर्कामुळे नंदकिशोर महाजन यांना मतदारसंघात दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत असून त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *