जळगाव | प्रतिनिधी जळगाव महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदित्य जिवने यांनी पहिल्याच महासभेत शहराच्या विकासाबाबत ठाम भूमिका मांडत, जनहितासाठी घेतल्या जाणाऱ्या कठोर निर्णयांमध्ये कोणतीही राजकीय आडकाठी येऊ नये, असा स्पष्ट संदेश दिला. “मी आयएएस आहे म्हणजे माझ्याकडे जादूची छडी नाही. शहराचा विकास हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातूनच शक्य आहे. मात्र कठोर निर्णय घेण्याची वेळ आली, तर त्यात राजकीय हस्तक्षेप होऊ नये,” असे ते म्हणाले.
महापौर दीपमाला काळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महासभेला उपमहापौर मनोज चौधरी, नगरसचिव शुक्ला तसेच सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. शहरातील विविध विकासकामे, मूलभूत सुविधा आणि प्रलंबित प्रश्नांवर नगरसेवकांनी प्रशासनाकडून ठोस कृतीची अपेक्षा व्यक्त केली.

त्यावर उत्तर देताना आयुक्त जिवने यांनी पदभार स्वीकारल्यानंतरच्या २८ दिवसांत शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या असून, महापालिकेची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सर्वप्रथम अत्यावश्यक आणि जनहिताच्या कामांना प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेशी संबंधित न्यायालयीन प्रकरणांचा सखोल अभ्यास करून त्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकमेकांवर दोषारोप करण्याऐवजी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सभागृहात उपस्थित सदस्यांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाला संयमाने आणि सविस्तर उत्तर देत आयुक्त जिवने यांनी प्रशासन प्रमुख म्हणून जबाबदारीने काम करण्याची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या पहिल्याच महासभेतील स्पष्ट आणि ठाम भूमिकेची शहराच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


