नशिराबाद | प्रतिनिधी : नशिराबाद येथील भवानीनगर परिसरात रविवारी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. घराच्या आवारातील पाण्याच्या हौदात पडून अवघ्या तीन वर्षांच्या कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील सदस्य जेवणासाठी बसले असताना आकांक्षा नेहमीप्रमाणे घराच्या आवारात खेळत होती. याचदरम्यान खेळण्याच्या नादात तिचा पाय घसरून ती पाण्याच्या हौदात पडली. काही वेळ ती दिसून न आल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ती हौदात आढळून आली. तिला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच पुढील कार्यवाहीसाठी सहकार्य केले.
आकांक्षाचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. काही दिवसांपूर्वीच तिचा तिसरा वाढदिवस कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात साजरा केला होता. वाढदिवसाच्या आनंदाच्या आठवणी ताज्या असतानाच या दुर्दैवी घटनेने इंगळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण भवानीनगर परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर घरातील पाण्याचे हौद, टाक्या आणि इतर धोकादायक ठिकाणी सुरक्षिततेची योग्य उपाययोजना करणे तसेच लहान मुलांवर सतत लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
Author: K P Chavan
thepubliclive


