October 10, 2026 4:26 am

Home » जळगाव » जळगावात महापौरांच्या शासकीय वाहनावर रॉडने हल्ला; अतिक्रमण कारवाईनंतर महापालिकेत गोंधळ

जळगावात महापौरांच्या शासकीय वाहनावर रॉडने हल्ला; अतिक्रमण कारवाईनंतर महापालिकेत गोंधळ

जळगाव : शहरातील टॉवर चौक परिसरात रसवंतीच्या गाडीवर अतिक्रमण विभागाने कारवाई केल्यानंतर संतप्त झालेल्या एका तरुणाने महापालिका आवारात येऊन महापौर दीपमाला काळे यांच्या शासकीय वाहनावर रॉडने प्रहार केल्याची घटना गुरुवारी (ता. ८) सायंकाळी घडली. या प्रकारामुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली असून, संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश महापौरांनी दिले आहेत.

 

 

रसवंतीची गाडी जप्त केल्यानंतर प्रकार

 

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सुरू आहे. गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यासमोरील मुख्य रस्त्यावर अतिक्रमण हटविण्याची कारवाई करताना विभागाच्या पथकाने एका रसवंतीची गाडी जप्त केली.

 

गाडीवर कारवाई झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ती चालविणारा तरुण महापालिकेत पोहोचला. त्याने परिसरात गोंधळ घालत महापौरांच्या आवारात उभ्या असलेल्या शासकीय वाहनावर रॉडने प्रहार केल्याची माहिती समोर आली आहे.

 

यावेळी वाहनचालकाने तत्काळ हस्तक्षेप करून तरुणाला दूर केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी?

वाहनावर हल्ला केल्यानंतर संबंधित तरुणाने अतिक्रमण विभागात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहितीही समोर आली आहे. या घटनेनंतर महापालिकेतील वातावरण तणावपूर्ण झाले.

महापौरांचे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश

घटनेची माहिती मिळाल्यानंतर महापौर दीपमाला काळे यांनी महापालिका आयुक्त आदित्य जिवने यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संबंधित तरुणाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईनंतर थेट महापालिका आवारात येऊन शासकीय वाहनावर हल्ला झाल्याच्या या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!