November 2, 2026 5:32 pm

लाईव्ह न्यूज :
लाईव्ह न्यूज :
Home » जळगाव » कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

कारागृहात रचला ३५ कोटींच्या दरोड्याचा कट! बडतर्फ PSI मास्टरमाइंड; भोकर SBI बँकेतील चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी : जळगाव तालुक्यातील भोकर येथे स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) शाखेवर भरदुपारी सशस्त्र दरोडा टाकून तब्बल ३५ कोटी रुपये किमतीचे सोने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी (३१ ऑक्टोबर) घडली. या घटनेचा तपास करताना आणखी खळबळजनक माहिती समोर आली आहे. या दरोड्याचा मुख्य सूत्रधार बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक (PSI) शंकर रमेश जासक असल्याचे तपासात उघड झाले आहे. विशेष म्हणजे, या दरोड्याचा कट जळगाव जिल्हा कारागृहातच रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दोन दुचाकींवरून आले चार दरोडेखोर

शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हेल्मेट आणि मास्क घालून दोन दुचाकींवरून चार दरोडेखोर भोकर येथील स्टेट बँकेच्या शाखेत दाखल झाले. त्यांनी बँकेचे रोखपाल आणि शाखा व्यवस्थापक जयेश राणे यांना एअरगनचा धाक दाखवून लॉकर रूममध्ये नेले. कर्मचाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला असता हवेत दोन राऊंड फायर केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर बँकेतील १६ लॉकरमधील सोन्याचे दागिने आणि सुमारे १५ लाख रुपयांची रोकड सहा बॅगांमध्ये भरून आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.

कारागृहात झाली ओळख; तिथेच आखला दरोड्याचा कट!

या प्रकरणातील मुख्य संशयित शंकर रमेश जासक हा २०२३ मध्ये जळगाव शहरातील कालिंकामाता मंदिर परिसरातील स्टेट बँक दरोडा प्रकरणात अटकेत होता. त्याच कारागृहात खून प्रकरणात अटकेत असलेल्या गजानन राजेंद्र पवार याच्याशी त्याची ओळख झाली. या ओळखीतून दोघांनी भोकर येथील बँक लुटण्याचा कट आखल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.

सुमारे सहा महिन्यांपूर्वी शंकर जासक जामिनावर बाहेर आला होता, तर गजानन पवार हा दीड महिन्यापूर्वी बाहेर आला होता. त्यानंतर त्यांनी इतर साथीदारांच्या मदतीने दरोड्याचे नियोजन केले.

चादर विक्रेते बनून केली बँकेची रेकी!

दरोड्यापूर्वी आरोपींनी चादरी विकणारे फेरीवाले बनून भोकर गावात फिरत बँकेची रेकी केली होती. बँकेची सुरक्षा व्यवस्था, कामकाजाची वेळ आणि परिसराची माहिती त्यांनी मिळवली होती. त्यानंतर योग्य वेळ साधून त्यांनी दरोडा टाकला.

पोलीस पाटील आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने दोन तासांत कारवाई

दरोड्याची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. पोलीस पाटील आणि ग्रामस्थांची मदत घेत संशयितांचा शोध सुरू करण्यात आला. डिक्साई परिसरात दोन संशयितांना मुद्देमालासह पकडण्यात आले, तर उर्वरित दोघांचा शोध घेत त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. तालुका आणि धरणगाव पोलिसांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या दोन तासांत चारही संशयित पोलिसांच्या ताब्यात आले. त्यांच्याकडून लुटीतील सोने आणि रोकड हस्तगत केल्याचे वृत्त आहे.

चार संशयितांची नावे

  1. शंकर रमेश जासक – खेडी, जळगाव.
  2. गजानन राजेंद्र पवार – न्यायडोंगरी, नाशिक.
  3. अंकुश श्रावण चव्हाण – रामदेववाडी, जळगाव.
  4. अंकुश तुळशीराम चव्हाण – खापरखेडा.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. कारागृहात असताना गुन्हेगारी कट कसा रचला गेला, या दरोड्यात आणखी कोणाचा सहभाग आहे आणि बँकेतील सुरक्षेतील त्रुटी काय होत्या, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

K P Chavan
Author: K P Chavan

jin88bet.one ak168app.baby ak168app.club ks168app.site ic88 ic88 ic88 ic88 lr88 lr88 lr88 lr88 op88 si88 88v SEXXXXX-VN

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!