October 27, 2026 1:54 pm

Home » जळगाव » जळगावात भरदिवसा हत्या! कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आरोपी अटकेत!

जळगावात भरदिवसा हत्या! कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाचा मृत्यू; आरोपी अटकेत!

जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरात कौटुंबिक वादातून २१ वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) दुपारी सुमारे एक वाजेच्या सुमारास घडली. छत्रपती शिवाजी महाराज परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, हल्ल्यात आणखी दोघे जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

सनी विनोद डोळे (वय २१, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सनी आणि त्याच्या बहिणीचा पती सुरज नारायण वानखेडे (रा. कंडारी, ता. भुसावळ) यांच्यात कौटुंबिक कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. संशयित सुरज वानखेडे याने सनीवर धारदार शस्त्राने वार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात सनी गंभीर जखमी झाला.

हल्ल्यानंतर सनीला तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. ऐन तारुण्यात सनीचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेत सनीची आजी सुमनबाई तायडे यांच्या हातालाही दुखापत झाली आहे. नातवाच्या मृत्यूची बातमी समजताच त्याची आई आणि आजी यांनी रुग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपी सुरज वानखेडे याला अटक केली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे.

कौटुंबिक वादातून घडलेल्या या जीवघेण्या घटनेमुळे जळगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

K P Chavan
Author: K P Chavan

thepubliclive

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!