नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आज आली आहे. पाकिस्तानने या घटनेवरून आपले हात झटकले आहेत. तसेच पाकिस्तनाचा आणि या घटनेचा काही काहीही संबंध नाही” असे म्हटले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी, पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नाही. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करतो. ही घटना होम ग्रोनची आहे. भारताविरुद्ध त्यांच्या तथाकथित संस्थानांमध्ये बंड झाले आहेत, फक्त एक नाही तर डझनभर. नागालँडपासून काश्मीरपर्यंत आणि छत्तीसगडपासून मणिपूरपर्यंत, दिल्लीच्या राजवटीविरुद्ध बंड झाले आहेत. ही घटना स्थानिक पातळीवर घडली. लोक त्यांचे हक्क मागत आहेत. हिंदुत्ववादी राजवट लोकांचे शोषण करत आहे. अल्पसंख्याकांचे शोषण केले जात आहे, ज्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि बौद्ध यांचा समावेश आहे. त्यांचा नरसंहार केला जात आहे.” असे त्यांनी म्हटले आहे.
ख्वाजा आसिफ पुढे म्हणाले, “हे केंद्र सरकारविरुद्धचे बंड आहे, ज्यामुळे तिथे अशा कारवाया होत आहेत. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत दहशतवादाचे समर्थन करत नाही आणि निष्पाप लोकांना लक्ष्य केले जाऊ नये. यामध्ये कोणत्याही संशयाला वाव नाही.’ असे म्हणत या घटनेवरून पाकिस्तानने उलट्या बोंबा मारायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका मीडिया टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, या हल्ल्यामागे पाकिस्तानचा कोणताही हात नाही. हे सर्व काश्मीरमधील लोक करत आहेत. तिथले सरकार लोकांचे हक्क हिरावून घेत आहे, ज्याविरुद्ध लोक बंड करू लागले आहेत.
