कोल्हापूर : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर असताना मिरज तालुक्यातील चाबुकस्वार वाडी जवळ ही घटना घडली. गुरुवारी सायंकाळी आमदार नायकवडी मिरज पूर्व भागातील जानराववाडी येथे जात असताना लिमये मळा परिसरात त्यांच्या मोटारीवर अज्ञातांनी दगड भिरकावले. या दगडफेकीत मोटारीच्या मागील काचेचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती त्यांचे पुत्र व माजी नगरसेवक अतहर नायकवडी यांनी दिली.

आमदार नायकवडी हे माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या गाडीत होते, तर दुसऱ्या गाडीत त्यांचे सुरक्षारक्षक आणि कार्यकर्ते होते. दोन दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या हल्ल्यात आमदार नायकवडी किंवा त्यांच्यासोबतच्या कोणालाही कसलीही जखम झाली नाही. या घटनेला आणखी एक गंभीर बाजू आहे. आमदार नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच आमदार नायकवडी यांना धमकीचे पत्र आले होते आणि याबाबत मिरज शहर पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून संशयास्पद व्यक्तींकडून टेहळणी केली जात असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आल्याचे अतहर नायकवडी यांनी सांगितले.
या हल्ल्यानंतर आमदार इद्रिस नायकवडी यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मी मिरज तालुक्यातील गावच्या प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होतो. जानराववाडी येथे येत असताना, आमच्या मागील गाडीवर दगडफेक करून अज्ञातांनी पळ काढला. सध्या पोलिस तपास करत आहेत. तपासाअंती पुढे काय करायचे, ते ठरवू. या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलिसांनी अज्ञात टिप्पर चालक व त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत साखरे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



