जामनेर : प्रतिनिधी
तालुक्यातील वाकोद येथे प्लॉट खरेदीत ७० जणांची दोन कोटी ९१ लाख रुपयात फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी नगरसेवक अनिलकुमार हिरालाल बोहरा (रा. आनंद नगर, जामनेर) यांच्याविरुद्ध पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची कुणकुण लागताच त्यांनी जामनेरातून पळ काढला आहे. पथक बोहराच्या मागावर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरी उर्फ संजय गणपत चौधरी (रा. वाकोद, ता. जामनेर) यांना अनिलकुमार हिरालाल बोहरा यांनी संबधित गटातील प्लॉट एन ए असल्याचे सांगितले. त्यानुसार चौधरी व बोहरा यांच्यात प्लॉटचा व्यवहार झाला. एक महिन्याच्या आत प्लॉट खरेदी करून द्यावी, असे ठरले. त्याप्रमाणे चौधरी यांनी ७ लाख ५० हजार रोख व मुलाच्या दोन खात्यांवरुन अडीच लाख रुपयांचा धनादेश दि. ३ सप्टेंबर २०२४ रोजी जमा केले.
यानंतर बोहरा यांनी सौदा पावती करून दिली. यानंतर चौधरी प्लॉट खरेदी करण्यासाठी वर्षभरापासून तगादा लावला. त्यावर बोहरा यांनी एनए परवानगी मिळाली असून दुसरी परवानगी मिळताच आपल्याला प्लॉट खरेदी करून देतो, अशी बतावणी केली. परंतु बोहरा यांनी आजतागायत प्लॉट खरेदी करून दिला नसल्याची फिर्यादी चौधरी यांनी दिली आहे. गावातील तब्बल ७० लोकांनी बयाणे देऊन बोहरांकडून प्लॉट घेतले आहेत. याठिकाणी जवळपास ८७ प्लॉट होते. पैकी ७० लोकांची तब्बल २ कोटी ९१ लाखात एनए प्लॉटच्या नावाखाली बोहरा याने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तक्रारदारांनी साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांच्याकडे आपबीती कथन केली. त्यानंतर बोहरा विरुद्ध बीएनएस ११८(४), ११६ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
