नवी दिल्ली : वृत्तसंस्था
उत्तरप्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यातील चुनार रेल्वे स्थानकाजवळ आज सकाळी घडलेल्या एका भीषण रेल्वे अपघातात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी आलेले हे सर्व भाविक रुळ ओलांडत असताना हरियाणातील कालका येथून हावडा दिशेने वेगाने धावणाऱ्या कालका एक्सप्रेस गाडीने त्यांना जोरदार धडक दिली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांबरोबरच प्रशासन देखील हादरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी सुमारे ९.३० वाजता चोपन येथून आलेली पॅसेंजर ट्रेन चुनार स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मवर दाखल झाली. गंगास्नानासाठी आलेले भाविक या गाडीतून उतरले आणि गंगेकाठी जाण्यासाठी शॉर्टकट म्हणून प्लॅटफॉर्म क्रमांक तीन ओलांडून रुळ पार करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी हावड्याकडे जाणारी कालका एक्सप्रेस विजेच्या वेगाने तिथून गेली आणि या भाविकांवर आदळली. धडक एवढी भीषण होती की काहींचे देहाचे तुकडे तुकडे झाले. सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून काहीजण गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर रेल्वे स्थानक परिसरात एकच आरडाओरडा सुरू झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतली. रेल्वे पोलिस (GRP) आणि रेल्वे संरक्षण दल (RPF) यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. मृतदेह आणि अवशेष गोळा करून ते सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले.
प्राथमिक माहितीनुसार, मृत सर्वजण उत्तरप्रदेश आणि बिहारमधील असून ते कार्तिक पौर्णिमेनिमित्त गंगास्नानासाठी आले होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून धार्मिक वातावरणावरही परिणाम झाला आहे. रेल्वे प्रशासनाने या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. स्थानक परिसरातील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून, जिल्हा प्रशासनाने मृतांच्या नातेवाइकांप्रती शोक व्यक्त करून आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. अपघाताच्या साक्षीदारांच्या मते, “गंगास्नानासाठी आलेल्या भाविकांची गर्दी इतकी प्रचंड होती की अनेकांनी रेल्वे फाटक किंवा पादचारी पूल वापरण्याऐवजी थेट रुळ ओलांडण्याचा मार्ग निवडला आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली.” या अपघातानंतर रेल्वे स्थानकावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सध्या ती पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून वारंवार अपील करण्यात येत आहे की प्रवाशांनी व भाविकांनी सुरक्षित मार्गानेच रुळ ओलांडावा, अन्यथा अशा दुर्घटना टाळणे अशक्य ठरेल.



