Home » राष्ट्रीय » भाड्याच्या घरात सुरू होता कुंटणखाना; शनिपेठ पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

भाड्याच्या घरात सुरू होता कुंटणखाना; शनिपेठ पोलिसांची कारवाई, आरोपी अटकेत

जळगाव : प्रतिनिधी

शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील योगेश्वर नगर परिसरात भाडेतत्त्वावर घेतलेल्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी व शनिपेठ पोलिसांनी सोमवारी सायंकाळी धडक कारवाई करत छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीस भाग पाडल्या जात असलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, योगेश्वर नगर भागात भाड्याच्या घरात अवैध कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने सापळा रचला. माहितीची खातरजमा करण्यासाठी एका बनावट ग्राहकाला संबंधित घरात पाठविण्यात आले. तेथे पंधराशे रुपयांत सौदा ठरल्याची खात्री झाल्यानंतर पंटरने बाहेर दबा धरून बसलेल्या पोलिस पथकाला मोबाईलवर ‘मिस कॉल’ देत इशारा दिला.

इशारा मिळताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घराला घेराव घालत छापा टाकला. घटनास्थळावरून कुंटणखाना चालवणाऱ्या मुख्य आरोपीसह दोन पीडित महिलांना ताब्यात घेण्यात आले. भरवस्तीत सुरू असलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक त्रस्त होते. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ रविंद्र मोतीराया, आवेश शेख, अमोल ठाकूर, प्रणय पवार तसेच महिला पोलीस कर्मचारी स्मिता पाटील यांच्या पथकाने केली.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *