जळगाव : प्रतिनिधी
भरधाव वाळूच्या डंपरने धडक दिल्याने कार तापी नदीत कोसळून मीनाक्षी नीलेश चौधरी (रा. विठ्ठल नगर) व त्यांचा मुलगा पार्थ (१२) यांचा मृत्यू झाला. तर नीलेश प्रभाकर चौधरी (वय ३६) व लहान मुलगा ध्रुव (वय ४) हे गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात विदगाव येथील तापी नदीच्या पुलावर मंगळवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास झाला.
चौधरी हे कुटुंबासह चोपडा येथे देवीच्या दर्शनाकरिता गेले होते. तेथून परतत असताना अपघातानंतर कार तापी नदीपात्रात कोसळली. नीलेश चौधरी हे धानोरा शाळेत शिक्षक आहेत. तर मयत मीनाक्षी चौधरी या शिवाजीनगरमधील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. या अपघातानंतर वाळूने भरलेला डंपर पुलावर आडवा पडला होता.
