Home » जळगाव » महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात; दोन तरुणांचा जागीच मृत्यू, पाच जखमी !

जळगाव : प्रतिनिधी 

जळगाव ते चांदवड महामार्गावरील बिल्दी फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात ५ तरुण गंभीर जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला तत्काळ जळगाव येथे उपचारार्थ हलवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील काही तरुण इनोव्हा कारने पाचोरा तालुक्यातील नाचणखेडा येथे हळदीच्या कार्यक्रमासाठी आले होते. हा कार्यक्रम आटोपून जळगावकडे परत असताना मध्यरात्री सुमारे १ वाजेच्या सुमारास पाचोरा ते जळगाव महामार्गावरील हॉटेल पांडुरंग गार्डनजवळ वाहना (एमएच-१७, बीएल-८८०८) चा भीषण अपघात झाला. कार वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या भीषण अपघातात पिंप्राळा येथील प्रसन्न रवींद्र निमजे (वय २३) व श्रीरंग सुरेश पाटील (वय २७) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रोहित सोनार (वय २३) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहेत.

तसेच पिंप्राळा येथील निखिल कच्छवा (वय २५), अनिकेत कोळी (वय २२), नीलेश वाघ (वय २३) हे जखमी आहेत. सर्व जखमींना तातडीने पाचोरा येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका चालक बबलू मराठे, भागवत पाटील, गोलू पाटील व किशोर लोहार यांनी घटनास्थळी धाव घेत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पाचोरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *