जळगाव : प्रतिनिधी
शहरातील शिवाजी नगर हुडको येथे माहेरी आलेली विवाहिता सपना शंकर वाघ (वय २७, रा. पारोळा) ही घरात झोपलेली असतांना, रात्रीच्या सुमारास त्या परिसरातील गजानन बाविस्कर हा त्यांच्या घरात शिरला. त्याने विवाहितेच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून विवाहितेकडील पैशांचे पाकीट घेवून पसार झाला. ही घटना दि. ७ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथील आण्णाभाऊ साठे नगरात सपना शंकर वाघ या विवाहिता वास्तव्यास आहे. त्यांचे माहेर शिवाजी नगर हुडको येथील आहे. आखाजीनिमित्त त्या दि. २८ एप्रिल रोजी माहेरी आलेल्या होत्या. दि. ६ रोजी रात्री त्या आईवडीलांसह गप्पा मारल्यानंतर घराचा दरवाजा लोटून त्या पावणेबारा वाजेच्या सुमारास झोपल्या. झोपेत त्यांना मानेवर कोणीतरी हात लावित असल्याचे जाणवल्याने जाग आली. यावेळी त्यांच्या बाजूला त्याच्या परिसरात राहणारा गजानन बाविस्कर हा दिसून आला. संशयित गजानन बाविस्कर याने त्याच्या हातातील धारदार चॉपरचा धाक दाखवून पैसे काढ अशी धमकी दिली.



