जळगाव : प्रतिनिधी
वरणगाव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रस्थापितांना जोरदार धक्का बसला असून, अपक्ष उमेदवार सुनील काळे यांनी भरघोस मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांच्या विजयानंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

या निवडणुकीत नगरसेवक पदासाठी भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासूनच आघाडी घेत मुसंडी मारल्याचे दिसून आले. एकूण २१ जागांपैकी भाजपचे १४ उमेदवार विजयी झाले असून, पक्षाने नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे पाच उमेदवार विजयी झाले आहेत. तर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी एक-एक उमेदवार निवडून आले आहेत. मात्र, या निकालात सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अपक्ष उमेदवार सुनील काळे यांच्या विजयाने. प्रस्थापित उमेदवारांना पराभूत करत त्यांनी मिळवलेला हा विजय मतदारांमध्ये बदलाची भावना दर्शवणारा मानला जात आहे.
निवडणूक निकाल जाहीर होताच विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. तर अपक्ष सुनील काळे यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनीही आनंदोत्सव साजरा केला. वरणगाव नगरपरिषदेतील आगामी सत्तासमीकरणांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.



