Home » राष्ट्रीय » ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी जळगावातील कंपनीला भीषण आग !

ट्रान्सफॉर्मर बदलल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी जळगावातील कंपनीला भीषण आग !

जळगाव : प्रतिनिधी

एमआयडीसी परिसरातील के-सेक्टरमधील साई किसान या ठिबक नळ्या तयार करणाऱ्या कंपनीला बुधवारी रात्री भीषण आग लागली. आगीचा विस्तार इतका मोठा होता की ती काही वेळातच शेजारच्या दोन कंपन्यांपर्यंत पसरली. या दुर्घटनेत कोट्यवधींचे नुकसान झाले असून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. विशेष म्हणजे मंगळवारीच या कंपनीतील ट्रान्सफॉर्मर व कट आउट बदलण्याचे काम झाले होते, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घटना घडली.

सविस्तर वृत्त असे की, जगन्नाथ जाधव यांच्या मालकीच्या साई किसान कंपनीत ठिबक नळ्यांचे उत्पादन सुरू असताना रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीची तीव्रता वाढताच कंपनीतील २० ते २५ कर्मचारी तत्काळ बाहेर पडले. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र प्लास्टिक साहित्य असल्याने आग काही क्षणातच रौद्ररूप धारण करून गोदामाभोवती पसरली. दरम्यान बाहेरील ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन परिस्थिती अधिक गंभीर बनली.

आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. माहिती मिळताच जळगाव महापालिका अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच भुसावळ, वरणगाव, नशिराबाद आणि इतर ठिकाणांहून बंबही पाचारण करण्यात आले. संयुक्त मोहिमेत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले; मात्र तेव्हापर्यंत शेजारच्या दोन कंपन्यांनाही मोठा फटका बसला होता.  अग्निशामन दलाचे काम रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. नुकसानाचे स्वरूप मोठे असून पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *