जळगाव : प्रतिनिधी
बोदवड-भुसावळ दरम्यान धावत्या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सरळ रस्त्याच्या बाजूला विजेच्या खांबावर आणि नंतर झाडाला आदळली मात्र या अपघातात बसमधील पंधरा प्रवासी बचावले आहेत. ही थरारक घटना भानखेडा, ता. बोदवड नजीक रविवारी दुपारी ३ वाजता घडली.

भुसावळ आगाराची ही बस एन. डी. पाटील नावाचे चालक चालवत होते. बोदवडहून वरणगावमार्गे भुसावळला जात असताना भानखेडा गावाजवळ चालक पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रसंगावधान राखत त्यांनी बसचा वेग नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला; मात्र नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडक देत पुढे असलेल्या झाडाला आदळली. बसमध्ये जवळपास बारा ते पंधरा प्रवासी होते. सुदैवाने, कोणालाही किरकोळ दुखापत वगळता जादा इजा झाली नाही. घटनेनंतर वाहकाने भुसावळ आगार आणि बोदवड बसस्थानकाला तत्काळ सूचना दिल्यामुळे प्रवाशांसाठी दुसरी बस पाठवण्यात आली. त्यात सर्व प्रवासी बसून पुढील प्रवासासाठी निघाले. या चालकाबाबत याच्याआधीही दोन वेळा प्रकृती अचानक बिघडल्याने अपघात घडल्याची चर्चा आहे परंतु यासंदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.



