भुसावळ : प्रतिनिधी
राष्ट्रीय महामार्गावर नशिराबाद टोलनाक्याजवळ गुरुवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात भुसावळ येथील एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून वाहनचालक तरुण गंभीर जखमी झाला आहे. चारचाकी वाहनाचे पुढील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही दुर्घटना घडली.

सविस्तर वृत्त असे कि, जळगावहून भुसावळकडे येणारी कार रात्री सुमारे दहा वाजेच्या सुमारास नशिराबाद टोलनाक्याजवळील पेट्रोल पंपासमोर पोहोचली असता अचानक वाहनाचे पुढील टायर फुटले. त्यामुळे भरधाव कार डिव्हायडर तोडून उलटली आणि त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरवर जोरदार धडकली. या अपघातात झोया नदीम पठाण (२२) या तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनचालक अरबाज खान (२६, रा. खडका रोड, रजा टॉवर परिसर, भुसावळ) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणाला तत्काळ गोदावरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची तीव्रता इतकी होती की कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. घटनेमुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. माहिती मिळताच नशिराबाद पोलिस व आपत्कालीन सेवा पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला आहे. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे भुसावळ शहरात शोककळा पसरली आहे.



