जळगाव : प्रतिनिधी
धावत्या चारचाकी वाहनाचे टायर फुटून ते विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ट्रेलरवर धडकून यश रमेश शिंपी (२३, रा. पाळधी) व पल्लवी छाडीकर (२०, रा. मेहरुण) हे दोघे जण जखमी झाले. हा अपघात रविवारी (७ डिसेंबर) संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास बायपासवर आव्हाणे शिवारात झाला. यासह अन्य एका अपघातात दोन जण जखमी झाले.

बायपासवर तरसोद फाट्याकडून पाळधीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहनाचे (क्र. एमएच १९, ईजी १८७८) टायर फुटले. त्यानंतर ते दुसऱ्या बाजूने पाळधीकडून तरसोदकडे जाणाऱ्या एका ट्रेलरच्या (क्र. सीजे ०७, बीआर ३७१७) डिझेल टैंकवर धडकले. यात वाहनाचा पूर्णपणे चुराडा झाला. यात यश शिंपी व पल्लवी छाडीकर हे दोघे गंभीर जखमी झाले. दोघांच्याही हाताला गंभीर दुखापत झाली असून तरुणाच्या पायालाही मार लागला आहे. दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.



