Home » जळगाव » किन्ही रस्त्यावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून बाप-लेक जागीच ठार

किन्ही रस्त्यावर काळाचा घाला; ट्रॅक्टर उलटून बाप-लेक जागीच ठार

भुसावळ : प्रतिनिधी

वरणगाव–विल्हाळे–किन्ही रस्त्यावर बुधवारी (दि. २४) दुपारी झालेल्या भीषण ट्रॅक्टर अपघाताने संपूर्ण वरणगाव शहराला धक्का बसला आहे. ट्रॅक्टर उलटून झालेल्या या दुर्घटनेत चालक वडील आणि त्यांचा सात वर्षीय चिमुकला मुलगा यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मजूर जखमी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे सिद्धेश्वर नगरसह परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर नगर, वरणगाव येथे राहणारे संजय श्रावण साबळे (वय ४०) हे आपल्या ट्रॅक्टरद्वारे किन्ही शिवारातील गिट्टी मशीनवर ‘कच’ आणण्यासाठी निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा सात वर्षीय मुलगा यश संजय साबळे तसेच मजूर अक्षय संतोष मोरे (वय २५) व किशोर श्रावण साबळे (वय ३०) हे प्रवास करत होते. ट्रॅक्टर विल्हाळे–किन्ही रस्त्याने जात असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर रस्त्यावरच पलटी झाला.

अपघात इतका भीषण होता की ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्याने संजय साबळे व त्यांचा मुलगा यश यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर काही क्षणांतच आनंदी कुटुंबावर दुःखाचा आघात झाला. मजूर अक्षय मोरे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अन्य जखमी मजुरावर प्राथमिक उपचार करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. अपघातानंतर वरणगाव ग्रामीण रुग्णालयात नातेवाइकांनी मोठी गर्दी केली होती. बाप-लेकाचा एकाच वेळी मृत्यू झाल्याचे समजताच कुटुंबीयांचा आक्रोश उपस्थितांचे काळीज पिळवटून टाकणारा होता.

संजय साबळे हे कुटुंबाचा आधारस्तंभ होते. त्यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय व नातेवाईक असा मोठा परिवार असून या दुर्घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित कुमार बागुल यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. भुसावळ तालुका पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

कामासाठी घराबाहेर पडलेल्या पित्याबरोबर निष्पाप मुलाचाही जीव गेल्याने संपूर्ण परिसर शोकसागरात बुडाला असून, या हृदयद्रावक घटनेने समाजमन हादरून गेले आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *