रावेर : प्रतिनिधी
सुरतहून दुचाकीने परतताना वणी येथील सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनानंतर रावेरकडे येणाऱ्या युवकाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी मालेगावजवळील सौदाने दरम्यान घडली. प्रणय मधुकर शिरनामे (वय २१, रा. जय गुरुदेवनगर, जुना सावदा रोड, रावेर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नोकरीच्या शोधात तो सुरत येथे गेला होता आणि एका खासगी कंपनीत काम करत होता. मात्र, प्रकृती बिघडल्यामुळे काही दिवसांपूर्वी तो रावेरला आपल्या घरी परत आला होता. त्याची मोटारसायकल सुरतला राहिल्यामुळे ती आणण्यासाठी तो पुन्हा मंगळवारी सुरतला गेला होता. आणि घरी येताना ही दुर्घटना घडली. प्रणय हा हेअर सलून व्यावसायिक मधुकर शिरनामे यांचा धाकटा मुलगा, तर दिव्यांग आघाडीचे कार्यकर्ते पवन शिरनामे यांचा तो लहान भाऊ. तो अविवाहित होता. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याचे पार्थिव घरी आणले आणि शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे ऐन नवरात्रीच्या काळात रावेर शहरात शोककळा पसरली आहे. तर शिरनामे कुटुंबावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे.
बुधवारी प्रणय हा सुरत येथून रावेर येथे आपल्या घरी परतत असताना नवरात्रोत्सवानिमित्त वणीच्या सप्तश्रृंग गडावर देवीच्या दर्शनासाठी तो थांबला. गुरुवारी पहाटे दर्शन घेऊन तो रावेरकडे परत येत असताना, सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास एका भरधाव कंटेनरने त्याच्या मोटारसायकलला जोरदार कट मारला. जखमी प्रणयचा मालेगाव सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला



