Home » जळगाव » रामदेववाडी जवळ भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

रामदेववाडी जवळ भीषण अपघातात तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

जळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील रामदेववाडी गावाजवळ रस्त्याने पायी जात असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाला भरधाव अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवार, २९ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास घडली. यामुळे रामदेववाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अभिसिंग राठोड (वय २१, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) असे अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मुकेश हा आई-वडिलांसोबत रामदेववाडीत राहत होता. बांधकाम बिगारी म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. बुधवारी रात्री ८:३० वाजेच्या सुमारास मुकेश हा गावाजवळील चायनीज दुकानावरून नाश्ता करून आपल्या घराकडे पायी परतत होता. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात आणि बेदरकार वाहनाने मुकेश याला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, मुकेश गंभीर जखमी झाला. या अपघातानंतर त्याला जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मुकेशच्या अपघाती निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. एकुलता एक कमाविता मुलगा गेल्याने आई-वडिलांचा आधार गेला असून, संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *