नवी दिल्ली : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून देशातील अनेक भागात आयुष्य संपविल्याच्या घटना घडत असताना आता उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात एका शिक्षकाच्या आत्महत्येची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुलरिहा परिसरातील शिवपूर शहबाजगंज येथे राहणारे शिक्षक कृष्ण मोहन सिंह यांनी शनिवारी गळफास घेऊन जीवन संपवले. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक भावनिक व्हिडिओ तयार केला तसेच चार पानी सुसाइड नोट लिहून ठेवली असून त्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये मृत शिक्षकांची व्यथा स्पष्टपणे दिसून येते. अत्यंत भावनिक होत त्यांनी म्हटले आहे, दादा मला माफ करा. मला मरायचे नव्हते. मला माझी बायको आणि मुल बाळांसाठी जगायचे होते, पण मला मरायला भाग पाडले गेले. माझे 16 लाख रुपये बुडाले. कृष्ण मोहन सिंह यांनी आरोप केला आहे की, शिक्षण विभागातील नोकरी आणि इतर कामांसाठी त्यांनी देवरिया येथील शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आणि बाबूंना पत्नीचे दागिने गहाण ठेवून आणि बँकेतून कर्ज काढून तब्बल 16 लाख रुपये दिले होते. मात्र काम न झाल्याने आणि पैसे परत न मिळाल्याने ते मानसिकदृष्ट्या खचले होते.
मृत कृष्ण मोहन सिंह हे यांना तीन भाऊ होते. त्यांचा मोठा भाऊ परदेशात राहतो. त्यांच्या पश्चात पत्नी गुडिया सिंह, 8 वर्षांची मुलगी आस्था आणि 6 वर्षांचा मुलगा आदित्य असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घटनेची माहिती मिळताच गुलरिहा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला. 22 फेब्रुवारी 2026 रोजी मृत शिक्षकांच्या पत्नी गुडिया सिंह यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधिकारी रवि कुमार सिंह यांनी सांगितले की, सुसाइड नोट आणि व्हिडिओ हे महत्त्वाचे पुरावे म्हणून जप्त करण्यात आले आहेत. शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.


