पुणे : वृत्तसंस्था
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा असताना राज्याचे माजी गृहमंत्री आणि सर्वसामान्यांच्या मनात ‘आबा’ म्हणून घर करणारे दिवंगत आर. आर. पाटील यांच्या वारशाचा ठसा पुन्हा एकदा राजकारणात उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार असून, त्यात रोहित आबा पाटील यांना युवक प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी मिळण्याची दाट शक्यता आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच पक्षात नवे चेहरे आणि तरुण नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या या पदावर काम पाहणारे मेहबूब शेख यांची जागा रोहित पाटील घेऊ शकतात. मेहबूब शेख हे पवारांचे विश्वासू आणि ग्रामीण भागात मजबूत संघटन उभारणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांची शैली आक्रमक असली तरी आता पक्षात संयमी आणि जनसंपर्कावर भर देणाऱ्या नेतृत्वाला पुढे आणण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती मिळते. त्यामुळेच तळागाळाशी थेट संवाद साधणारे आणि तरुण मतदारांमध्ये लोकप्रिय असलेले रोहित पाटील हे या पदासाठी अग्रस्थानी आहेत.
कोण आहेत रोहित पाटील?
रोहित पाटील हे राज्याचे माजी गृहमंत्री आणि जनतेच्या हृदयात आजही स्थान असणारे आर. आर. पाटील यांचे सुपुत्र आहेत. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अवघे 10 आमदार निवडून आले. यामध्ये रोहित पाटील यांचा समावेश आहे. अवघ्या 25 वर्षांच्या वयात त्यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार संजयकाका पाटील यांचा पराभव करून सर्वांचे लक्ष वेधले होते. तब्बल 1 लाख 26 हजार 478 मते मिळवत त्यांनी विजय मिळवला.
रोहित पवार यांनी कायद्याचे शिक्षण घेतले असून, राजकारणात पदार्पण केल्यापासूनच ते जनसंपर्क, सुसंवाद आणि प्रामाणिक काम यावर भर देत आहेत. त्यांच्या वडिलांप्रमाणेच लोकांशी थेट संपर्क ठेवण्याची हातोटी आणि तळागाळातील समस्यांची जाण हे त्यांचे बलस्थान मानले जाते. गेल्या काही वर्षांपासून ते सातत्याने आपल्या मतदारसंघात सक्रिय आहेत आणि तरुण नेतृत्व म्हणून झपाट्याने पुढे येत आहेत.



