मुंबई : वृत्तसंस्था
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे. केंद्र व राज्यात एकाच विचाराचे सरकार आहे. पण त्यानंतरही भाजप सरकारकडून जनतेची घोर फसवणूक केली जात आहे, असे ते म्हणालेत.

राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद आहे. त्यात मुंबई महापालिकेसह राज्यातील सर्वच महापालिकांच्या निवडणुकांचा आज कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आज दुपारी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या प्रकरणी त्यांनी भाजपने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, भाजपने लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. पण दुर्दैवाने अजूनही लाडक्या बहिणींच्या कोात्यात 2100 रुपयांचा हप्ता जमा झाला नाही.
महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. पण भाजपने दिलेले कर्जमुक्तीचे आश्वासन अद्याप पूर्ण झाले नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी तर नाहीच, पण सरकारने जाहीर केलेली मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. केंद्रात व राज्यात भाजचे सरकार आहे. पण तरीही सरकार खोट्या घोषणा करत आहे. भाजपच्या सर्वच घोषणा फसव्या आहेत, असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी पगडी, सेस असलेल्या मालमत्तेच्या बाबतीतही जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला. सरकारने पगडी, सेस असलेल्या मालमत्तांवरही जनतेची फसवणूक केली. सरकारने सर्व भाडेकरूंना ‘भोगवटादार’ दर्जा द्यावा आणि घरमालकांकडून होणाऱ्या निष्कासनाविरुद्ध कायदेशीर संरक्षण द्यावे. ‘सक्षम प्राधिकरणा’चा कायदेशीर प्रश्न न्यायालयात सोडवावा. इमारतीच्या स्थितीऐवजी इमारतीचे वय पुनर्विकासासाठी निकष म्हणून ठेवावे, असे ते म्हणाले.
या प्रकरणी त्यांनी सरकारवर पगडी सेस मालमत्तांमधील भाडेकरूंऐवजी घरमालक व बिल्डर्सची बाजू घेतल्याचा आरोप केला. सरकारच्या निर्णयामुळे भाडेकरूंना फक्त तेवढीच जागा मिळेल, जेवढी त्यांच्याकडे आधीपासून आहे. याऊलट घरमालक/बिल्डर्सना अतिरिक्त एफएसआय, टीडीआर आणि इतर सवलती मिळतील, असे ते म्हणाले. आम्ही भाडेकरूंच्या हक्कांसाठी त्यांच्यासोबत उभे आहोत. त्यांचे संरक्षण कोणत्याही परिस्थितीत झालेच पाहिजे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.



