जळगाव : प्रतिनिधी
आसोदा रेल्वे उड्डाण पुलाखाली धावत्या रेल्वेखाली सापडून एका अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला होता. बुधवारी २४ सप्टेंबर सकाळी या व्यक्तीची ओळख पटली असून, तो शहरातील वाल्मीक नगर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली. आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर सुदाम पाटील (वय ५५, रा. वाल्मीक नगर, जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

ज्ञानेश्वर पाटील हे रिक्षा चालवून आणि एका खाजगी कंपनीत काम करून उदरनिर्वाह करत होते. सोमवारी रात्री ते कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले होते. रात्री १० वाजता त्यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला होता, परंतु ओळख पटत नसल्याने पोलिसांनी सुरुवातीला अनोळखी व्यक्ती म्हणून नोंद केली होती. बुधवारी सकाळी नातेवाइकांनी ओळख पटवल्यानंतर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठवला. बुधवारी, सकाळी ११ वाजता मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.



