Home » जळगाव » विजयाचा जल्लोष अन फटाक्यांची आतषबाजीनंतर गवताला लागली आग !

विजयाचा जल्लोष अन फटाक्यांची आतषबाजीनंतर गवताला लागली आग !

जळगाव : प्रतिनिधी

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर विजयाचा जल्लोष साजरा करताना तरुणांनी काव्यरत्नावली चौकात फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानावरील गवताला आग लागली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन बंबांनी तत्काळ धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

भारत विरुद्ध न्यूझिलँड यांच्यात आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबई येथील मैदावर खेळला जात होता. या सामन्यात भारताने विजय मिळवल्यानंतर शहरात आतषबाजी करण्यात आली. यातच शहरातील काही हौशी क्रिकेट शौकिनांनी काव्य रत्नावली चौकात भारताचा विजय झाल्यानंतर रात्री ११ वाजेच्या सुमारास फटाक्यांची आतषबाजी केली. यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या मोकळ्या मैदानातील गवताला अचानक आग लागली. पाहता-पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले. यानंतर ही माहिती तेथून जवळच असलेल्या जळगाव महापालिकेच्या अग्निनमन दलाला मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न  करता घटनास्थळी धाव घेतली. या वेळी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळ न दवडता तत्काळ पाण्याचा मारा सुरु केला. तर काही वेळातच या कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. यात सुर्दैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही घटना लक्षात येताच परिसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत झाडांच्या फांद्यांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केलेत.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *