Home » राष्ट्रीय » कृषीमंत्री कोकाटेंचे खळबळजनक वक्तव्य : बाकी सगळे कांदा लावत सुटतात

कृषीमंत्री कोकाटेंचे खळबळजनक वक्तव्य : बाकी सगळे कांदा लावत सुटतात

नाशिक : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता, कर्जमाफीच्या आलेल्या पैशांमधून लग्न आणि साखरपुडा करता, असं माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं होतं. माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं होतं. त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली होती.

तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी देखील माणिकराव कोकाटेंना खडेबोल सुनावले होते. देवगिरी निवासस्थानी झालेल्या बैठकीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह इतर मंत्र्यांना ‘एकदा-दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी चूक केल्यास माफी नाही, तर मंत्रिपद बदलू’, असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता.

त्यानंतर आता पुन्हा एकदा कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांद्याच्या दरावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कांद्याचे बाजारभाव पडायला शेतकरीच जबाबदार आहेत. एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात’ असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

माणिकराव कोकाटे म्हणाले, एखाद्या शेतकऱ्याला कांद्याच्या बाजारभावाचा फायदा झाला म्हणून, बाकी सगळे कांदा लावत सुटतात, कांद्याची लागवड किती करावी यालाही मर्यादा आहे, दुप्पट तिप्पट ठीक पण पन्नास पटीने कांद्याची लागवड करायला लागले, तर कांद्याचे बाजारभाव पडणारच, अशा शब्दात कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी कांद्याच्या बाजारभावावरुन शेतकऱ्यांना खडेबोल सुनावलं आहे. त्यामुळे कोकाटे यांच्या या वक्तव्यावरून आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *