मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात येत्या काही दिवसांवर गणेशोत्सव येवून ठेपलेला आहे. यामुळे राज्यभरात मोठी धामधूम पाहायला मिळत आहे. पावासाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली. याशिवाय पावसाळी अधिवेशनात अनेक मोठी निर्णयही घेण्यात आले. मात्र, बळीराज्याच्या डोक्यावरील कर्ज कधी दूर होणार याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार याविषयी सातत्याने बोललं जात आहे. अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांवरील कर्जमाफीबाबत एक विधान केलं आहे.
आता लाडकी बहिण आणि वीज माफीवर काम सुरु आहे. कर्जमाफी आमच्या जाहीरनाम्यात होती. योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. यामुळे लवकरच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय होणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी त्यांच्या विधानातून केलं आहे. अजित पवार यांची पत्रकार परिषद सुरू असताना त्यांना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे. योग्यवेळ कधी येणार? असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता त्यावर योग्यवेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना, असं उत्तर अजित पवारांनी उत्तर दिलं.
पुढं ते म्हणाले की आमच्या जाहीरनाम्यात होतं. एकंदरीत राज्यकारभार करताना सर्व गोष्टींचा विचार करुन पुढे पावलं उचलावी लागतात. आमच्या मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना मी सांगितलय. योग्यवेळ आल्यावर निर्णय घेऊ, असं अजित पवार म्हणाले आहेत.
गेल्या दोन ते तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. यावर बोलताना अजित पवार म्हणाले शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. तिथे पंचनामा करायला सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांच सुद्धा बारकाईने लक्ष आहे भीतीचे कारण राहिलेलं नाही.
