Home » महाराष्ट्र » …सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचतोय ; केंद्रीय मंत्री गडकरींचे विधान !

…सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचतोय ; केंद्रीय मंत्री गडकरींचे विधान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी,”देशात गरिबी वाढत आहे आणि सर्व पैसा फक्त काही श्रीमंत लोकांपर्यंत पोहोचत असल्याचे मोठे विधान केले आहे. नितीन गडकरी यांनी यावेळी, “वाढत्या गरिबीच्या पार्श्वभूमीवर, पैशाचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे जेणेकरून केवळ आर्थिक विकासच होणार नाही तर गावकऱ्यांचे कल्याण देखील सुनिश्चित होईल” असे म्हटले आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात बोलताना,”शेती, उत्पादन, कर आकारणी आणि पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारी यासारख्या मुद्द्यांवर भाष्य केले.  यावेळी त्यांनी,”अर्थव्यवस्था अशा प्रकारे विकसित करावी लागेल की ती रोजगार निर्माण करेल आणि ग्रामीण भागाला प्रोत्साहन देईल” असे म्हटले.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, हळूहळू गरिबांची संख्या वाढत आहे आणि काही श्रीमंत लोकांच्या हातात संपत्ती केंद्रित होत आहे. असे होता कामा नये. अर्थव्यवस्था अशा प्रकारे विकसित केली पाहिजे की रोजगार निर्माण होईल आणि ग्रामीण भागाचे कल्याण सुनिश्चित होईल” असे त्यांनी म्हटले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी,”आम्ही अशा आर्थिक मॉडेलचा विचार करत आहोत ज्यामुळे रोजगार निर्माण होतील आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना मिळेल. संपत्तीचे विकेंद्रीकरण करण्याची गरज आहे आणि या दिशेने अनेक बदल झाले आहेत.”असे सांगितले.

दुसरीकडे, नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांचे कौतुक केले, परंतु अनियंत्रित केंद्रीकरणाविरुद्ध इशारा दिला. पुढे ते म्हणाले की, “आपल्याला याबद्दल काळजी करावी लागेल.” तसेच ते म्हणाले की, “भारताच्या आर्थिक रचनेचा संदर्भ देत, गडकरी यांनी जीडीपीमध्ये विविध क्षेत्रांच्या योगदानातील असमतोल अधोरेखित केला.”

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, “उत्पादन क्षेत्राचे योगदान २२-२४ टक्के आहे, सेवा क्षेत्र ५२-५४ टक्के आहे, तर ग्रामीण लोकसंख्येच्या ६५-७० टक्के लोकांवर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचे योगदान फक्त १२ टक्के आहे. त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी स्वामी विवेकानंदांचे उद्धरण दिले आणि म्हटले की ज्याचे पोट रिकामे आहे त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही.

परिवहन विभागाचा उल्लेख करत त्यांनी,”मी रस्ते बांधणीसाठी बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर (बीओटी) प्रणाली सुरू केली आहे. रस्ते विकासासाठी पैशांची कमतरता नाही” असे सांगितले. तसेच ‘कधीकधी मी म्हणतो की माझ्याकडे पैशांची कमतरता नाही, पण कामाची कमतरता आहे” असेही मिश्कीलपणे म्हटले. त्यासोबतच गडकरी म्हणाले की, “सध्या आपण टोल बूथमधून सुमारे ५५,००० कोटी रुपये कमवतो आणि पुढील दोन वर्षांत आपले उत्पन्न १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.” असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. दरम्यान,  टोलबाबत ते म्हणाले की, “जर आपण पुढील १५ वर्षे त्याचे चलनीकरण केले तर आपल्याला १२ लाख कोटी रुपये मिळतील. नवीन टोलमधून अधिक उत्पन्न मिळेल”

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *