जळगाव : प्रतिनिधी
कुटुंबीय गावातील यात्रेत गेलेले असताना घरी कोणीही नसतांना भिकन किसन पाटील (वय ५५, रा. ममुराबाद, ता. जळगाव) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी उघडकीस आली. प्रौढाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील ममुराबाद येथे भिकन पाटील हे वास्तव्यास होते. त्यांच्या गावात रविवारी यात्रा असल्याने त्यांच्या घरातील सर्व सदस्य बारागाड्यानिमित्त आयोजित यात्रेत गेलेले होते. त्या वेळी घरी एकटेच असताना पाटील यांनी गळफास घेतला. पत्नी व मुले घरी आले त्या वेळी त्यांना ही घटना लक्षात आली. त्या वेळी पाटील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.



