भुसावळ : प्रतिनिधी
बँकेतून पैसे काढल्यानंतर पाळत ठेवून बसलेल्या संशयिताने रमजान शहा बुढन शहा (वय ७७, रा. मुस्लिम कॉलनी) यांच्यावर हल्ला करीत त्यांच्याजवळील रोकड लुटून नेली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास भुसावळ शहरातील कृष्णलीला हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, शहरातील मुस्लिम कॉलनीत राहणारे रमजान शहा हे मशिदीत अजान देण्याचे काम करतात. त्याकरीता संस्थेकडून पाच हजार रुपयांचे मानधन दिले जाते. शुक्रवारी त्यांनी मानधन घेतले आणि त्यांच्याजवळ असलेले दोन हजार रुपये घेवून ते बाजार करण्याकरीता निघाले. त्यानंतर त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या आनंद नगर शाखेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळणारी तीन हजार रुपये पेंशन काढून ती पासबुकमध्ये जमा केली. दुपारी ४ वाजेच्या सुमारास बँकेतून बाहेर पडल्यानंतर पाळत ठेवून बसलेला संशयिताने त्यांचा पाठलाग केला.
ते वृद्ध हे कृष्णलीला हॉटेल जवळ आले असता, पाळत ठेवलेल्या संशयिताने त्यांच्यावर हल्ला करीत मारहाण केली. तसेच त्यांच्याजवळ असलेली पैसे ठेवलेली बॅग हिसकावून घेत त्यांना किसी को बताया, तो मार डालूंगा अशी धमकी देत तो संशयित तेथून पसार झाला. उपस्थित काही लोकांनी हस्तक्षेप केला, पण आरोपीने त्यांनाही धमकावले. दिवसाढवळ्या वृद्धाला मारहाण करुन त्याच्याजवळील पैसे लुटून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रमजान शहा यांनी बाजारपेठ पोलीसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लागलीच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून त्यांच्याकडून चोरट्याचा शोध घेतला जात आहे.



