भुसावळ : प्रतिनिधी
दीपनगर येथील सरगम गेटसमोर झालेल्या भीषण अपघातात वरणगाव येथील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, १२ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता घडली. अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली आहे. अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव हुजेब रऊफ खाटीक (वय १९, रा. वरणगाव) असे आहे. तो सहा बहिणींचा एकुलता भाऊ होता.

सविस्तर वृत्त असे कि, हुजेब हा जुन्या महामार्गावरील सरगम गेटजवळील चिकन दुकानासमोरून पायी जात असताना एमएच १९ आर ९५२६ या क्रमांकाच्या दुचाकीने त्याला जबर धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर बबलू रमेश भागेश्वर (वय ५२, रा. वाघनगर, जळगाव) हा चालक असून तो दारूच्या नशेत वाहन चालवत होता. त्याच्यासोबत मागील आसनावर महेश विजय चौधरी (वय ४६, रा. सुभाषनगर, भुसावळ) हा बसलेला होता. अपघातानंतर दोघांनाही जखमी अवस्थेत जळगाव येथे उपचारासाठी हलविण्यात आले. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



