Home » महाराष्ट्र » आईच्या नावाने डान्सबार चालवता, लाज वाटत नाही?” ; अनिल परब यांचा गंभीर आरोप !

आईच्या नावाने डान्सबार चालवता, लाज वाटत नाही?” ; अनिल परब यांचा गंभीर आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या काही दिवसापासून राज्याच्या राजकारणात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधानपरिषदेचे आमदार अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि त्यांचे वडील रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप करत राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे.

मुंबईतील कांदिवली येथील ‘सावली’ डान्सबार हा योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर असल्याचा दावा परब यांनी केला आहे. या बारवर पोलिसांनी धाड टाकून 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतलं होतं. यावरून परब यांनी कदम कुटुंबीयांवर जोरदार टीकास्त्र सोडत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

मुंबईत पत्रकार परिषदेत बोलताना अनिल परब यांनी थेट कदम पितापुत्रांना लक्ष्य केलं. “गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावाने डान्सबार चालतो, तोही पोलिस स्टेशनच्या नाकाखाली! योगेश कदम नवी मुंबईपर्यंत डान्सबारवर धाडी टाकायला जातात, कारण तिथे अश्लीलता पसरते, अनैतिक धंदे चालतात.

मग स्वत:च्या आईच्या नावाने चालणाऱ्या डान्सबारवर कारवाई कोण करणार? अशा बारमध्ये मुली नाचवल्या जातात, अश्लील कृत्ये होतात, पैसे उडवले जातात. याची सगळी माहिती पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये आहे. तरीही कदम कुटुंबीय कारवाईपासून कसे सुटतात?” असा सवाल परब यांनी उपस्थित केला.

परब यांनी पुढे म्हटलं, “योगेश कदम मला ‘अर्धवट वकील’ म्हणाले. पण मी विधानसभेत आमदार म्हणून बोलतो, माझी ही चौथी टर्म आहे. मला कायदे आणि नियम माहिती आहेत. मला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मी माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या पुराव्यांवर बोलत आहे, जे खोटे असू शकत नाहीत.

पुरावे दाखवत राजीनाम्याची मागणी

परब यांनी ‘सावली’ बारच्या प्रकरणात गंभीर तथ्ये मांडली. या बारवर 30 मे 2025 रोजी समतानगर पोलिसांनी धाड टाकली. तेव्हा 22 बारबाला, 22 ग्राहक आणि 4 कर्मचाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं. बारचं परमिट योगेश कदम यांच्या आई ज्योती कदम यांच्या नावावर आहे. ऑर्केस्ट्रासाठी फक्त 5 मुलींना परवानगी असताना 14 मुली सापडल्या.

नृत्यावेळी अश्लील कृत्ये होत असल्याचं पोलिस रेकॉर्डमध्ये नमूद आहे. यापूर्वीही या बारवर दोनदा कारवाई झाली, पण कदम कुटुंबीयांनी कोणतीही सुधारणा केली नाही. कायद्यानुसार, परवानाधारक जबाबदार असतो, मग तो बार दुसऱ्याला चालवायला दिला असला तरीही,” असं परब यांनी स्पष्ट केलं.

परब यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली आहे. “मी सगळी कागदपत्रं गृहमंत्री फडणवीस यांना देणार आहे. त्यांनी तातडीने कारवाई करावी. हा बार योगेश कदम यांच्या आईच्या नावावर आहे, हे त्यांनी मान्य केलं आहे. मग नियमांचं उल्लंघन का होतंय? मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी यावर कारवाई करून कदम यांचा राजीनामा घ्यावा,” असं परब यांनी ठणकावलं.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *