चाळीसगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील एका गावात शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडल्याच्या कारणावरून एका महिलेचा विनयभंग करून मारहाण व अश्लील शिवीगाळ केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दोघा सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शेताच्या बांधावर असलेले निंबाचे झाड तोडल्याच्या संशयावरून आरोपी दोघे पीडित महिलेच्या पतीला शिवीगाळ करत होते. हा प्रकार पाहून पीडित महिलेने शिवीगाळ का करता, अशी विचारणा केली असता आरोपींनी महिलेलाच अश्लील शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. तसेच तिचा मोबाईल फोन हिसकावून दांड्याने मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या मारहाणीत महिला जखमी झाली असून तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुरुवातीला पोलिसांकडून योग्य कारवाई होत नसल्याचा आरोप करत पीडित महिलेने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला होता. अर्जात आरोपींकडून वारंवार अश्लील शिवीगाळ, धमक्या देणे व परिसरात दहशत निर्माण केल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्यानंतर पीडितेच्या सुधारित तक्रारीनुसार चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी दोघा भावांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार विजय शिंदे करीत आहेत.



