Home » महाराष्ट्र » लाडकी बहिण योजनेत तब्बल 26 लाख लाभार्थी अपात्र ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

लाडकी बहिण योजनेत तब्बल 26 लाख लाभार्थी अपात्र ; मंत्री अदिती तटकरेंची माहिती !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला असल्याचे समोर आले आहे. तब्बल 26 लाख लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र नसल्याचे समोर आले आहे. याबाबत महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे.

अदिती तटकरे यांनी ट्विट करत माहिती दिली की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थींपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करुन दिली होती. सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत.

त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थींची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करुन दिलेली आहे. त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सुक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावर सुरु आहे. छाननीअंती या लाभार्थींची पात्रता/अपात्रता स्पष्ट होणार आहे. छाननीअंती जे लाभार्थी अपात्र ठरतील त्यांच्याबाबत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य कारवाई करण्यात येईल, तसेच पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांचा लाभ यापुढेही पुवर्वत सुरु राहील, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे.

 

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *