Home » महाराष्ट्र » निवडणूक जिंकताच लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

निवडणूक जिंकताच लाडक्या बहिणींना दिली आनंदाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’बाबत मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना सध्या दरमहिन्याला १५०० रुपये मिळत असले तरी, लवकरच हा हप्ता २१०० रुपयांपर्यंत वाढवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

निवडणूक निकालानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेनेच्या इतिहासात एवढ्या नगराध्यक्षांची निवड झाली नव्हती. यासाठी कार्यकर्ते आणि लाडक्या बहिणींचे अभिनंदन. लाडकी बहीण योजना ही माझी सर्वात आवडती योजना आहे. अनेकांनी विरोध केला, पण आम्ही योजना सुरू ठेवली. कोणताही माई का लाल ही योजना बंद करू शकत नाही. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार म्हणजे देणारच. योग्य वेळी सन्मान निधीत वाढ करू, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधताना महाविकास आघाडीच्या काळात अडथळे आणले गेले, पण ते दूर करून महाराष्ट्राला पुढे नेल्याचे सांगितले. त्यांनी लेक लाडकी, मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि आरोग्य योजनांचाही उल्लेख केला.

दरम्यान, लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि मकर संक्रांतीच्या (१४ जानेवारी) पूर्वी हे वितरण होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *