भुसावळ : प्रतिनिधी
तालुक्यातील वरणगाव येथे एटीएम कार्डची अदलाबदल करून फसवणुकीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपळगाव येथील सुनील पंडित पाटील यांनी या संदर्भात वरणगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी सुमारे ९:२५ वाजता पाटील यांच्या खात्यातून वरणगाव येथील एटीएमवरून अज्ञात व्यक्तीने दोन हजार काढले. त्या अनोळखी व्यक्तीने पाटील यांचे मूळ एटीएम कार्ड स्वतःकडे ठेवून त्यांना दुसरे कार्ड देत फसवणुकीची सुरुवात केली. त्यानंतर भुसावळ येथील एटीएमवरून वेळोवेळी २५ हजार रुपये काढण्यात आले. तक्रारदार पाटील यांनी वरणगाव येथील एटीएमवरील सकाळी ९:३० वाजताच्या सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध घेण्यासाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.



