कोल्हापूर : वृत्तसंस्था
कोल्हापूर जिल्ह्यात लग्नसमारंभातून अवघ्या सात वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी आईसोबत नातेवाईकांच्या लग्नाला आली असताना 28 वर्षीय विकास कांबळे या युवकाने तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. मुलीच्या वेळीच दिलेल्या आरडाओरड्याने आणि उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

कात्यायनी–गिरगाव मार्गावर काही लोकांसोबत फिरत असताना आरोपी तिच्या मागोमाग गेला आणि जबरदस्तीने उसाच्या शेतात ओढून नेण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने घाबरलेली मुलगी मोठ्याने ओरडू लागली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून लोकांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या हवाली केले. इस्पूर्ली पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
या प्रकारानंतर परिसरात तीव्र संतापाची लाट पसरली आहे. एवढ्या लहान मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न होणे हा समाजाला कलंकित करणारा प्रसंग असल्याची प्रतिक्रिया सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. मुलगी मानसिक धक्क्यात असून तिच्यावर समुपदेशन व वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कुटुंबीय चिंताग्रस्त असून आनंदाचा माहोल क्षणात भीतीत व दुःखात बदलला आहे. महिलांवरील व अल्पवयीन मुलींवरील वाढत्या अत्याचारांमुळे सुरक्षेबाबत पुन्हा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.



