बीड : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात तुरुंगात खडी फोडणाऱ्या वाल्मीक कराडची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात तो पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला कोण रे तू कुत्रा? म्हणत जातीवाचक शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. या क्लिपमुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहात आहे. तिथे त्याच्या जीवितास धोका असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे त्याला नाशिकच्या तुरुंगात हलवण्याची चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर वाल्मीक कराडची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. दिव्य मराठी या क्लिपची पुष्टी करत नाही. पण त्या क्लिपमधील आवाज हा वाल्मीक कराडचाच असल्याचा दावा केला जात आहे.
या क्लिमध्ये वाल्मीक कराड एका व्यक्तीला पैशाच्या व्यवहारातून जातीवाचक शिवीगाळ करताना ऐकू येत आहे. आता सगळ्यांनाच मध्ये घेतो. तू कोण रे कुत्रा, अशी भाषा वापरत वाल्मीक यात समोरच्या व्यक्तीला धमकावत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, वाल्मीकला फोन करणाऱ्या व्यक्तीने एका कामासाठी त्याला लाखो रुपये दिले होते. पण वाल्मीक कराड त्याला हे पैसे करत नव्हता. त्यामुळे तो फोन करून त्याला पैसे परत करण्याचा तगादा लावत होता. याचा राग येऊन वाल्मीकने सदर व्यक्तीला अर्वाच्य व जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगण्यात येत आहे.
या कॉल रेकॉर्डिंगसंबंधी वाल्मीक कराडचे जुने सहकारी विजयसिंह (बाळा) बांगर यांनी विस्तृत माहिती दिली आहे. ते म्हणाले, एका व्यक्तीने वाल्मीक कराडला कामासाठी 10 लाख रुपये दिले होते. हे पैसे परत मागण्यासाठी संबंधित व्यक्तीने वाल्मीकला फोन केला. पण त्याने त्याला पैसे देण्याऐवजी त्याला शिवीगाळ करून त्याला धमकावले. जिवाच्या भीतीने हे कुटुंब पुढे येण्यास तयार नाही. कारण, जिल्ह्यात वाल्मीकची प्रचंड दहशत आहे. पण झाला प्रकार अत्यंत धक्कादायक असल्यामुळे मी या प्रकरणी बीडच्या पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना ही कॉल रेकॉर्डिंग देणार आहे, असे त्यांनी सांगितले. वाल्मीक कराडने संबंधित व्यक्तीला 5 रुपये देऊन खंडणीच्या गुन्ह्यात अडकवल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.



