Home » राष्ट्रीय » बांगलादेश हादरला : माजी पंतप्रधान शेख हसिनांना मृत्युदंडाची शिक्षा!

बांगलादेश हादरला : माजी पंतप्रधान शेख हसिनांना मृत्युदंडाची शिक्षा!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था


आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसिना यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती गुलाम मुर्तझा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुमारे ४०० पानी तपशीलवार निकाल दिला आहे.

सुनावणीदरम्यान मानवाधिकार संघटनांच्या अहवालांसह विविध संस्थांकडून मिळालेल्या दस्तऐवजांचा सखोल अभ्यास करण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले. न्यायाधिकरणाने मोठ्या प्रमाणात निदर्शकांचे मृत्यू आणि झालेल्या अत्याचारांचा उल्लेख करत, शेख हसिना यांनी बॉम्ब हल्ल्यांना परवानगी दिल्याचा गंभीर निष्कर्ष दिला. या प्रकरणात माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि माजी पोलिस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामुन यांनाही आरोपी करण्यात आले आहे. निकाल १३ नोव्हेंबरला अपेक्षित असला, तरी प्रक्रियात्मक कारणांमुळे तो १७ नोव्हेंबर रोजी देण्यात आला. सर्व पक्षांनी आपले युक्तिवाद २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केले होते.

निकालानंतर बांगलादेशात पुन्हा अस्थिरता निर्माण झाली असून देशभरातून हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अवामी लीगने बांगलादेश बंदची घोषणा केली आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी युनूस सरकारने हिंसाचारात सहभागी असलेल्या व्यक्तींवर गोळीबाराचे आदेश दिले आहेत. राजधानी ढाका सहित चार जिल्ह्यांमध्ये बॉर्डर गार्ड बांगलादेशचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तपास अहवालाचा उल्लेख करत न्यायालयाने सांगितले की शेख हसिना सरकारने विद्यार्थी नेते अबू सईद यांच्या पोस्टमॉर्टम अहवालात चार ते पाच वेळा फेरफार केला होता. १६ जुलै २०२४ रोजी पोलिसांच्या गोळीबारात अबू सईदचा मृत्यू झाला होता, ज्यामुळे सरकारविरोधी विद्यार्थी आंदोलनाला भडक रूप आले. डॉक्टरांना धमकावून, त्यांच्या विरोधात गुप्तचर अहवाल असल्याचे सांगून पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास भाग पाडल्याचा न्यायालयाने उल्लेख केला.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *