Home » जळगाव » चाळीसगाव » बापरे : सफाई कर्मचाऱ्याने लांबवली ४५ लाखांची रक्कम !

बापरे : सफाई कर्मचाऱ्याने लांबवली ४५ लाखांची रक्कम !

चाळीसगाव : प्रतिनिधी

शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंपन्यांचे मजुरांचे पगार, बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी व इतर खर्चासाठी लागणारी ४५ लाख रुपयांची रोकड, १६ हजार रुपये किमतीची हार्डडिस्क आणि ३०० रुपये किमतीचा पेन ड्राइव्ह असा एकूण ४५ लाख १६ हजार ३०० रुपये कितीचा ऐवज कार्यालयातून चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यात चोरीत संशयित आरोपी हा कार्यालयातून काढून टाकलेला कर्मचारी साईनाथ पंढरीनाथ चौधरी हा आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रकल्प संचालकाच्या फिर्यादीवरून चाळीसगाव येथील साईनाथ पंढरीनाथ चौधरी याच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, मुंबई येथील कंपनीचा चाळीसगाव येथे मालेगाव रोडवर शिवनेरी पार्क या नावाने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी गृह प्रकल्प सुरू आहे.  या कंपनीची मालेगाव रोड येथे साइट व ऑफिस असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे कार्यालय आहे. या प्रकल्पाच्या बांधकामाचे काम अन्य कंपनीस दिले आहे. या कंपनीचा प्रशासकीय व आर्थिक कारभार याच कार्यालयातून होतो. या दोन्ही कंपन्यांनी वेळोवेळी दैनंदिन व इतर खर्चासाठी रोख रक्कम तसेच शिवनेरी पार्क येथे वास्तव्यास असलेल्या ठेकेदाराने सुरक्षेच्या दृष्टीने जमा केलेले ४५ लाख रुपये दि. ३० ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवलेले होते.

ही रक्कम व काही कागदपत्रे तसेच पेन ड्राइव्ह व हार्डडिस्क दिसून आले नाही. त्यामुळे प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहिले असता दि. २ रोजी सकाळी ७:२६ वाजेच्या सुमारास एक मुलगा वॉचमनकडून चावी घेऊन झाडू घेऊन आत शिरला लाइट बंद करून पिशवी घेऊन आत गेला व एक गोणी घेऊन आला व पिशवीसह गोणी घेऊन तो निघून गेला. या पैशांची चोरी साईनाथ पंढरीनाथ चौधरी (रा. मराठा मंगल कार्यालय, चाळीसगाव) याने केल्याचे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. साईनाथ याला कंपनीने कामावरून यापूर्वीच काढून टाकले असताना त्याने कंपनीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात साफसफाई करण्यासाठी आल्याचे वॉचमनला खोटे सांगत वॉचमनकडून चावी घेऊन कार्यालयात प्रवेश केला. राजेंद्र रामसिंग पाटील यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *