मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडत सुनेत्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड करण्यात आली होती.

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदी निवडीनंतर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा नक्कीच चांगला विषय आहे. राजकीय डावपेच मी सांगू शकत नाही; मात्र अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांनी आता सर्वांना सोबत घेऊन चालावे. सध्या अनेक गिधाडे घिरट्या घालायला लागली आहेत. अजित पवारांसोबत कधी न दिसणारे लोक आता पुढे येत आहेत. अशा अचानक जमलेल्या लोकांवर लक्ष ठेवावे,” असा सल्लाही त्यांनी दिला. काही अडचणींमुळे सुनेत्रा पवार यांनी तातडीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले असावे, असे नमूद करत जरांगे पाटील म्हणाले की, “पार्थ पवार आणि जय पवार यांना अजित पवार यांनी काही सल्ला दिला असेल, तर त्याचे पालन करावे.”
दरम्यान, आज सकाळी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीबाबत आपल्याला कोणतीही माहिती नव्हती आणि आपल्याशी चर्चा झाली नाही, असे विधान केले होते. यावर प्रतिक्रिया देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, “तो त्यांचा डावपेच असू शकतो. मात्र सुनेत्रा पवार यांनी सर्वांना सोबत घेऊन चालावे. गिधाडे आणि ढेकणं घात करू शकतात. अशा वेळी पवार कुटुंबच त्यांच्या उपयोगी येईल,” असेही त्यांनी सांगितले.



