Home » राष्ट्रीय » भडगाव हादरले : शाळेच्या निष्काळजीपणामुळे नाल्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू !

भडगाव हादरले : शाळेच्या निष्काळजीपणामुळे नाल्यात बुडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू !

भडगाव : प्रतिनिधी

भडगाव शहरातील आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या दोन चिमुकल्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी (दि. १६ डिसेंबर) सकाळी अत्यंत हृदयद्रावक मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेच्या संरक्षण भिंतीवरून तोल जाऊन ही दोन्ही बालके जवळील नाल्यात पडली असून पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेने संपूर्ण भडगाव शहरात शोककळा पसरली असून शाळेच्या निष्काळजीपणाबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अंश सागर तहसीलदार (वय ३ वर्षे ६ महिने, रा. आदर्श कॉलनी, भडगाव) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (वय ४ वर्षे २ महिने, रा. बालाजी गल्ली, भडगाव) या दोन नर्सरी वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श कन्या इंग्लिश मीडियम स्कूलच्या नर्सरी वर्गात शिकणारी ही दोन्ही बालके खेळत असताना किंवा वर्गाबाहेर असताना शाळेच्या संरक्षक भिंतीजवळ पोहोचली. खेळताना अचानक तोल गेल्याने दोघेही भिंतीवरून थेट जवळच्या नाल्यात कोसळले. नाल्यातील पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. काही वेळानंतर मृतदेह फुगून पाण्यावर आल्याने ही भीषण घटना उघडकीस आली आणि परिसरात एकच खळबळ उडाली.

या दुर्घटनेनंतर पालक, नातेवाईक व स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. शाळेच्या संरक्षण भिंतीला कोणताही अडोका, जाळी अथवा पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. इतक्या लहान वयाच्या नर्सरीच्या विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर एकटे जाण्याची परवानगी कशी देण्यात आली? त्या वेळी शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन कुठे होते? विद्यार्थ्यांवर योग्य देखरेख का ठेवली गेली नाही? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन निष्पाप बालकांना आपला जीव गमवावा लागल्याने पालक, नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या गंभीर निष्काळजीपणासाठी संबंधित शाळा व्यवस्थापनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी प्रशासनाकडे केली जात आहे.

K P chavan
Author: K P chavan

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *