भुसावळ : प्रतिनिधी
शहरात शनिवारी दुपारी डायल 112 या आपत्कालीन सेवेला आलेल्या एका खोट्या कॉलमुळे पोलिसांची चांगलीच धांदल उडाली. शांतीनगर पाण्याच्या टाकीजवळील एन. के. नारखेडे इंग्लिश मीडियम स्कूल परिसरात दुपारी सुमारे 1.15 वाजता प्राप्त झालेल्या या कॉलमध्ये गंभीर माहिती देण्यात आली होती. सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका टाळण्यासाठी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

तथापि, तपासादरम्यान या कॉलमधील सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले. कॉल करणारे नवलकिशोर पाटील (62, रा. मोरगाव बु. ता. रावेर) यांनी त्यांच्या चुलत भावाकडे मोबाइलद्वारे शरीरात बसवलेल्या कथित बॉम्बचे नियंत्रण असल्याचा दावा केला होता. मात्र प्राथमिक तपासात अशा कोणत्याही दाव्याचा आधार मिळाला नाही आणि परिसरात कोणताही धोका नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. खोट्या माहितीनुसार पोलिसांचा मौल्यवान वेळ आणि मनुष्यबळ वाया गेल्याने पोलिस कर्मचारी राहुल भोई यांच्या फिर्यादीवरून भुसावळ शहर पोलिस स्टेशनमध्ये नवलकिशोर पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, डायल 112 सारख्या आपत्कालीन सेवांचा गैरवापर हा गंभीर गुन्हा असून अशा कृत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. खोट्या कॉल्समुळे प्रत्यक्ष आपत्तींच्या वेळी मदत पोहोचण्यात विलंब होऊ शकतो, त्यामुळे नागरिकांनी अशा कृतींपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.



